काँग्रेस आघाडीच्या काळात महंगाई डायन हा शब्द चांगलाच फेमस झाला होता. बॉलीवूड चित्रपटातील एका गीताचा आधार घेऊन विरोधी पक्षांनी याच महंगाई डायनला प्रचारात फिरविले अन यूपीए ची सत्ता गेली. निवडणुकीतील असे काही मुद्दे इतकी प्रभावी ठरतात की बडे बडे किल्ले आणि आणी मोठमोठी घराणी नेस्तनाबूत होतात. जनतेच्या मताची किंमत तेव्हाच कळते. औरंगाबाद लोकसभा मतदार संघात अफवाई डायन कुणाचा किल्ला उद्ध्वस्त करते याकडे लक्ष लागले आहे. या अफवाई डायनने उमेदवारांची रातो की निंद हराम कर दी! कालच्या एका प्रसंगाने अफवाई डायनला ङ्गअच्छे दिनफ आले. महावीर जयंतीच्या मिरवणुकीत कट्टर शिवसैनिक प्रदीप जैस्वाल आणि काँग्रेसचे उमेदवार सुभाष झांबड यांच्या कानगोष्टी मीडियाने टिपल्या. हे फोटो आता व्हायरल होत आहेत आणि राजकीय पक्ष, चाणाक्ष मंडळी या फोटो खाली चटपटीत भाष्य करून अफवांचे पेव बाजारात पेरत आहेत. तर ट्रॅक्टर बुलेट ट्रेनच्या वेगाने ट्रॅक्टर धावू लागलेय. या अफवाई डायनचा फटका नेमका कुणाला बसणार याच्या गणितात सध्या सारे दंग आहेत. औरंगाबाद लोकसभेचे गणित इतके किचकट पूर्वी कधीही नव्हते. खरेतर राजकीय त्सुनामी औरंगाबाद मतदारसंघातच आली की काय, असे आता वाटू लागलेय. मराठवाड्यातील सहा जिल्हे आज निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर पडत आहेत. आता औरंगाबाद-जालना या दोन जिल्ह्यात प्रचाराचा धुराळा उडणार आहे. त्यामुळे अफवाई डायन किती वेगाने पसरेल याचा विचारच न केलेलाच बरा! गल्ली -मोहल्ल्यात निरनिराळ्या अफवा पेरल्या जातील, वोटिंगचे गणित लावून अफवांची निर्मिती केली जाईल. अफवांचे निर्माते, दिग्दर्शक आणि अॅक्टर यांना आता सोन्याचे दिवस आलेेत. गलेलठ्ठ मोबदला घेऊन हे अफवाई मास्टरमाइंड कामाला लागलेत. नवेनवे मेसेजस, व्हिडीओ बनविण्याचे काम अहोरात्र केले जात आहे. अफवांना सत्यतेचे लेबल लावून बिनधास्त बाजारात खपवले जाते. ईव्हीएम यंत्रात बंद झालेल्या मतदानाची आकडेवारी व्हायरल करून एक गमतीदार अफवा सध्या चर्चेचा विषय बनलीय. मतदान होण्याच्या आधीच कुणाला किती मते मिळतील याची आकडेवारी जाहीर करीत एका उमेदवाराला विजयीही घोषित करून टाकले. गंमत म्हणून जरी या मेसेज कडे पाहिले तरी राजकीय धूर्तपणा नजरेआड करता येणार नाही. आश्चर्य म्हणजे सगळ्याच पक्षांचे नेते, कार्यकर्ते हा मेसेज अलटून पालटून फॉरवर्ड करतायेत. एकच मेसेज आकडेवारी आणि उमेदवार बदलून शहरभर धुमाकूळ घालतोय. मजा तेव्हाच येते जेव्हा दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते सोबत चहा पिताना एकच मेसेज वाचत असतात. आपल्याला नको असलेल्या एरियात जाऊन विरोधाचा व्हिडिओ समर्थकांच्या एरिया टाकाण्याचे प्रकारही होऊ लागलेत. नशीब अजूनही सामाजिक सलोखा बिघडवणारी अफवाई डायन मार्केटमध्ये आली नाही. शहराची सामाजिक, राजकीय आणि आर्थिक घडी विस्कटून टाकण्याचे पाप हीच अफवाई डायन करेल. त्यामुळे हातात आलेल्या इंटरनेटद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचवणार्या बातम्या आणि मेसेज यावर किती विश्वास ठेवायचा याचा विचार ज्याने त्याने आपापल्या परीने करावा यातच सर्वांचे भले आहे!